अरेच्चा: पोलीस कॉन्स्टेबलने १२ वर्षे गायब राहूनही घेतला २५ लाखांचा पगार; मध्य प्रदेश पोलिस विभागातील धक्कादायक प्रकार उघड

अरेच्चा: पोलीस कॉन्स्टेबलने १२ वर्षे गायब राहूनही घेतला २५ लाखांचा पगार; मध्य प्रदेश पोलिस विभागातील धक्कादायक प्रकार उघड
विदिशा (वृत्तसंस्था): मध्य प्रदेश पोलिस विभागातील गोंधळ आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. विदिशा जिल्ह्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलने तब्बल १२ वर्षे कामावर न जाता, कोणतीही सेवा बजावली नाही तरीही त्याने अंदाजे २५ लाख रुपयांचा पगार उचलला असल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कॉन्स्टेबलची २०११ साली मध्य प्रदेश पोलिस दलात नियुक्ती झाली होती. सुरुवातीला भोपाळ पोलिस लाईन्समध्ये त्याची पोस्टिंग झाली आणि काही काळानंतर त्याला सागर येथील बेसिक ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले. मात्र, प्रशिक्षणासाठी जाण्याऐवजी तो थेट आपल्या गावी, विदिशा येथे निघून गेला, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) अंकिता खाटेरकर यांनी दिली.
विशेष म्हणजे, त्याने वरिष्ठांना कोणतीही सूचना न देता किंवा अधिकृत रजा न घेता स्वतःच्या सर्व्हिस रेकॉर्डची कागदपत्रे स्पीड पोस्टने भोपाळला पाठवून दिली. आश्चर्य म्हणजे, भोपाळ पोलिस लाईन्समधील संबंधित अधिकाऱ्यांनी ही कागदपत्रे पडताळणी न करता स्वीकारली. प्रशिक्षण केंद्रात त्याच्या अनुपस्थितीची कोणतीही नोंद झाली नाही आणि भोपाळमध्येही त्याच्या अनुपस्थितीबाबत कोणतीही चौकशी करण्यात आली नाही.
या दरम्यान, महिन्यानमहिने आणि नंतर वर्षानुवर्षे उलटत गेली, पण हा कॉन्स्टेबल कधीच कामावर हजर झाला नाही. तरीही त्याचे नाव हजेरीच्या यादीत कायम राहिले आणि त्याला नियमित पगारही मिळत राहिला.
अखेर उलगडा कसा झाला?
२०२३ मध्ये विभागाकडून २०११ च्या बॅचचे वार्षिक मूल्यमापन सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. संबंधित अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याचा शोध घेतला, तेव्हा विभागातील कोणालाही त्याचे नाव किंवा चेहरा आठवत नव्हता. अंतर्गत चौकशीत त्याच्या उपस्थितीची किंवा सेवाकाळाची कोणतीही नोंद सापडली नाही.
चौकशीसाठी बोलावल्यावर संबंधित कॉन्स्टेबलने मानसिक आजार झाल्याचा दावा केला आणि यासंदर्भात काही वैद्यकीय कागदपत्रेही सादर केली. त्याच्या म्हणण्यानुसार, आजारपणामुळेच तो इतक्या वर्षांत कामावर परत येऊ शकला नाही.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून भोपाळच्या टीटी नगर भागात तैनात असलेल्या एसीपी अंकिता खाटेरकर यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.