
कळंब येथे अट्टल घरफोड्यांची ‘मोगलीस गँग’ जेरबंद
तीन लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ प्रतिनिधी
कळंब घरफोडी करणाऱ्या एका ‘मोगलीस गैंग’ला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून सोन्याचा ऐवज, मोबाइल व एक दुचाकी असा एकूण ३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींमध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. ही कारवाई २ फेब्रुवारीला पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या पथकासह कळंब पोलिसांनी केली.
प्रथमेश अनिल दोनाडकर (१९) रा. तलाव फैल व अन्य दोन विधिसंघर्षग्रस्त बालक असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांत कळंब शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली. यात दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोडीचे सत्र सुरुच होते. या चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंथा
यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी व कळंब पोलिसांना दिले होते. त्याअनुषंगाने कळंब येथे घरफोडीच्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक शहरात सिसिटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रीक तपास करीत होते. गोपनिय व तांत्रीक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी यवतमाळ शहरातील एका ‘मोगलीस गंग’ मधील दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह संबधीत आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. तसेच त्याने आपल्या दोन साथीदारांसह कळंब येथे तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यावरून ‘मोगलीस गैंग’ला अटक केली. तसेच गुन्हयातील चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज, मोबाईल व एक दुचाकी वाहन असा एकुण ३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस निरीक्षक राजेश राठोड, पोलीस उपनिरीक्षक सागर भारस्कर, अंन्सार वेग, विकास कमनर, प्रविण उईके, योगेश डोंगरे, गिरीश मडावी यांनी केली आहे