
शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांचा विजय बिनविरोध निश्चित
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (शिंदे गट) ने धडाकेबाज कामगिरी करत सलग दुसरे यश संपादन केले आहे. प्रभाग ९ ‘अ’ मधून शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांचा विजय बिनविरोध निश्चित झाला असून, अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीची ताकद अपेक्षेप्रमाणे दिसून येत नसल्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होत असून, महायुतीचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. आतापर्यंत महायुतीतील तीन नगरसेवक बिनविरोध निश्चित झाले आहेत. बुधवारी सायंकाळी प्रभाग १२ ‘ब’ मधून भाजपच्या उज्ज्वलाताई बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी प्रभाग १८ ‘अ’ मधून शिवसेनेचे डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर सोनवणे यांच्या माघारीमुळे बिनविरोध निवडून आले.
या यशानंतर दुपारी प्रभाग ९ ‘अ’ मधील अपक्ष उमेदवार राहुल अशोक लोखंडे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतल्याने मनोज सुरेश चौधरी यांचा विजय निश्चित झाला आहे. आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असून, या बिनविरोध यशामुळे शिवसेना शिंदे गटाच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयानंतर मनोज चौधरी आणि त्यांच्या समर्थकांनी महापालिका परिसरात जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला.






