धक्कादायक ; झोपेत असणाऱ्या महिलेचे हातपाय बांधून अज्ञात चोरट्यांनी दागिन्यांसह रोकड लांबवली

धक्कादायक ; झोपेत असणाऱ्या महिलेचे हातपाय बांधून अज्ञात चोरट्यांनी दागिन्यांसह रोकड लांबवली
महिलेच्या सावत्र मुलावर संशयाची सुई
एरंडोल : शहरातील गांधीपुरा भागातील जय हिंद चौक परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी थरकाप उडवणारी घटना घडवली. उषाबाई भिका बडगुजर (वय ५२) या महिलेला झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी गाठले. त्यांनी उषाबाई यांच्या तोंडावर कपडा बांधून हात-पाय दोरीने घट्ट बांधले आणि त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३९ हजार ५५० रुपयांचा ऐवज लंपास केला.
ही घटना रविवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडली. उषाबाई बडगुजर या एकट्याच राहतात. त्यांचे पती भिका बडगुजर रेल्वे खात्यात भुसावळ डिव्हिजनमध्ये केबिन मॅन पदावर कार्यरत होते व २००३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर उषाबाई फॅमिली पेन्शनवर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. भिका बडगुजर यांचे दुसरे लग्न सुमनबाई बडगुजर यांच्याशी झाले होते. त्यांना झालेली मुले जळगाव येथे वास्तव्यास आहे.
घटनास्थळी तपास करताना महत्त्वाची बाब समोर आली आहे की, उषाबाई यांच्या घराच्या लोखंडी गेटचे कुलूप रात्री झोपण्यापूर्वी लावले गेले होते. मात्र, त्या कुलपाची एक चावी त्यांचा सावत्र मुलगा अरुण भिका बडगुजर याच्याकडे असल्याची माहिती मिळाली आहे. अरुण याने यापूर्वीही उषाबाई यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या, अशी तक्रार आहे.
सदर प्रकरणी उषाबाई बडगुजर यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चोरीमागे कोणाचा हात आहे आणि यामध्ये कौटुंबिक वाद कारणीभूत आहे का, याचा तपास सुरू आहे.