Crime

धुळ्याच्या विश्रामगृहात सापडली एक कोटी ८४ लाख रुपयांची रोकड

धुळ्याच्या विश्रामगृहात सापडली एक कोटी ८४ लाख रुपयांची रोकड

अनिल गोटे यांच्या आंदोलनानंतर झाली कारवाई ; राजकीय वर्तुळात खळबळ

धुळे  l महापोलीस न्यूज l २२/०५/२०२५

नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या आमदारांच्या समितीतील सदस्यांच्या स्वागतासाठी विश्रामगृहात साडेपाच कोटी रुपये ठेवले असल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. त्यांच्या आरोपानंतर बुधवार (२१ मे) रात्री ११ वाजेच्या सुमारास विश्रामगृहातील कुलूपबंद खोलीचे दरवाजे तोडून इन-कॅमेरा पंचनामा सुरू करण्यात आला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या मोजणीअंती, १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये रोख रक्कम आढळून आली.

पाच सदस्यीय तपासणी समितीकडून खोलीची झडती

रात्री उशिरा प्रांताधिकारी रोहन कुवर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, उद्धव सेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी आणि कॅमेरामन माळी यांच्या उपस्थितीत इन-कॅमेरा तपासणी करण्यात आली. यावेळी खोलीत काही रिकाम्या बॅगाही सापडल्याने त्यामध्ये आधी आणखी मोठी रक्कम ठेवण्यात आली असावी व ती स्थलांतरित केल्याची शक्यता अनिल गोटे यांनी व्यक्त केली.

पाच तास आंदोलनानंतर सुरू झाली कारवाई

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनिल गोटे यांनी संध्याकाळी ६ वाजेपासून तब्बल पाच तास विश्रामगृहासमोर ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरा अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत पंचनामा सुरू केला. दरम्यान, तपासणी सुरू असताना अनिल गोटे रूमच्या बाहेरच समर्थकांसह बसून होते. यावेळी उद्धव सेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सापडलेल्या रकमेचा स्रोत काय, ती कुणाची होती, आणि कोणत्या हेतूने ती ठेवली गेली याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. या प्रकरणी गोटे यांनी यापूर्वीही भ्रष्टाचाराचे आरोप करत चौकशीची मागणी केली होती. आता प्रत्यक्ष रक्कम सापडल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button