प्रभाग क्रमांक ८-अ मधून भाजपच्या कविता सागर पाटील रिंगणात

प्रभाग क्रमांक ८-अ मधून भाजपच्या कविता सागर पाटील रिंगणात
नामनिर्देशन अर्ज सादर करताना समर्थकांची गर्दी; विकासाचा निर्धार
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८-अ मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार कविता सागर पाटील यांनी आपला नामनिर्देशन अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कविता सागर पाटील यांनी आतापर्यंत आपल्या प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवत नागरिकांशी थेट नाते जोडले आहे. आरोग्य शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असून, ही त्यांच्या सामाजिक कार्याची पावती असल्याची भावना समर्थकांतून व्यक्त होत आहे.
प्रभागातील नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची ताकद हीच आपली खरी ताकद असल्याचे सांगत, निवडणूक जिंकल्यानंतर प्रभाग क्रमांक ८-अ चा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार कविता सागर पाटील यांनी व्यक्त केला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर भर राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.






