
अवैध मुरूम वाहतूक तात्काळ थांबवा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही वाहतूक सुरू
कारवाई न झाल्यास हायकोर्टात दाद ; राष्ट्रीय जनमंच पक्षाचा इशारा
चाळीसगाव प्रतिनिधी I महा पोलीस न्यूज चाळीसगाव–धुळे रेल्वे लाईनलगत करगाव रोडजवळ उभारण्यात येत असलेल्या मालवाहतुकीच्या रेल्वे धक्क्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूमाची गरज भासत असून, या कामासाठी साईराम JV या कंपनीकडून बेकायदेशीररीत्या मुरूम वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय जनमंच पक्षाने केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊनही अवैध मुरूम वाहतूक थांबलेली नसून, तातडीने कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे.
साईराम JV या कंपनीला केवळ ५०० ब्रास मुरूम वाहतुकीची अधिकृत परवानगी दि. २५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी देण्यात आली होती. मात्र ही मुदत संपून आठ दिवस उलटले असतानाही, कोणतीही नवीन रॉयल्टी परवानगी नसताना आणि शासकीय महसूल न भरता रोज रात्री मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. धुळे रेल्वे लाईनलगत उभारण्यात येत असलेल्या रेल्वे माल धक्क्यावर सुमारे १५ ते २० हजार ब्रास मुरूम साठवून ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
रॉयल्टीपोटी अवघे तीन लाख रुपये भरले असताना प्रत्यक्षात करगाव शिवारातून कोट्यवधी रुपयांचा मुरूम चोरीने काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अधिकृत कागदपत्रांनुसार उत्खनन क्षेत्र डोन–दिगर शिवारात असून ते रेल्वे धक्क्यापासून १५ ते १८ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र प्रत्यक्षात करगाव परिसरातून अवघ्या २ ते २.५ किलोमीटर अंतरावरूनच मोठ्या प्रमाणावर मुरूम उचलण्यात येत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
दररोज रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत १० ते १२ डंपर बेधडकपणे मुरूम वाहतूक करत असल्याने गौण खनिज वाहतुकीवरील कायदेशीर बंदीचा उघडपणे भंग होत आहे. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, प्रांत कार्यालय व आरटीओ विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय जनमंच पक्षाने केला आहे.
या संदर्भात राष्ट्रीय जनमंच पक्षाने दि. ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी चौकशी सुरू असतानाच कंपनी व ठेकेदार बिनधास्तपणे अवैध वाहतूक सुरू ठेवत असल्याचे चित्र आहे. जणू प्रशासनालाच पाठीशी घातल्याच्या आविर्भावात हे मुरूम माफिया वावरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या अवैध वाहतुकीमुळे करगाव रोडचे प्रचंड नुकसान झाले असून, रातोरात वाहतूक सुरू असताना प्रशासन मूकदर्शक बनल्याची टीका करण्यात आली आहे. वारंवार तक्रारी करूनही महसूल, पोलीस वा आरटीओ विभागाने ठोस कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय जनमंच पक्षाचे प्रदेश सचिव संदीप लांडगे यांनी संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, करगाव व डोन–दिगर शिवारातील मंडल अधिकारी, शहर तलाठी व चाळीसगाव मंडल अधिकारी यांच्यावर शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य विसरून मुरूम माफियांना पाठीशी घातल्याचा आरोप करत, या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयात तसेच गरज पडल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित कंपनी व ठेकेदारांकडून शासनाचा महसूल वसूल करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही न्यायालयामार्फत केली जाणार आहे.






