
महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर । अमळनेर नगरपरिषदेत आज परिश्रम मजूर सहकारी संस्थेच्या कामकाजातील अन्याय आणि शोषणाविरोधात तीव्र आंदोलन घडले. जयेश सुभाष पाटील, शुभम आधार यादव आणि दीपक बोरसे या युवकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे निवेदन सादर करत लेखी आश्वासनाची मागणी केली. मात्र, मुख्याधिकारी लेखी उत्तर देण्याऐवजी आपली केबिन बंद करून कार्यालयातून निघून गेल्याचे आंदोलकांनी सांगितले.
या वर्तनाविरोधात संतप्त झालेल्या जयेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण यांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढली आणि आज संध्याकाळी ४ वाजता मुख्याधिकाऱ्यांशी चर्चेसाठी वेळ दिली. त्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित केले.
आता संध्याकाळच्या बैठकीनंतर प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिश्रम मजूर सहकारी संस्थेच्या कामगारांच्या समस्यांवर योग्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.