Crime

भिंगाण येथील दरोड्याचा श्रीगोंदा पोलिसांनी लावला छडा!

तीन आरोपींना अटक, चोरीचा माल हस्तगत, फरार आरोपींचा शोध सुरू

श्रीगोंदा l महापोलीस न्यूज l 10 मे 2025

श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण खालसा येथे दरोडा टाकून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तीन आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. या प्रकरणी चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई 22 एप्रिल 2025 रोजी रात्री घडलेल्या दरोड्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने राबवली.

भिंगाण खालसा येथील शैला भिवसेन तोंडे (वय 40, रा. भिंगाण खालसा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या आपल्या पती भिवसेन भाऊ तोंडे आणि सासरे यांच्यासह घराच्या पडवीत झोपल्या असताना 22 एप्रिल रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी शैला यांचे दोन्ही हात पकडून दाबून धरले, डोक्याचे केस ओढले आणि उजव्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. चाकूचा धाक दाखवत त्यांनी गळ्यातील अक्काबाई डोरले आणि मिनी गंठण असे 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरले.

याच वेळी शैला यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचे पती जागे झाले आणि त्यांना सोडवण्यासाठी गेले असता, हल्लेखोरांनी त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर चाकूने वार करून गंभीर जखम केली. या घटनेनंतर शैला यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची नावे संकेत प्रताप गायकवाड (वय 20, रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा), वैभव नानासाहेब लबडे (वय 20, रा. घायपतवाडी, ता. श्रीगोंदा) आणि चंदा किरण ताम्हाणे (वय 37, रा. होली गल्ली, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी आहेत. चौकशीदरम्यान या आरोपींनी हर्षद किरण ताम्हाणे आणि त्याच्या दोन ते तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे अक्काबाई डोरले आणि मिनी गंठण असा सर्व माल जप्त केला आहे. दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची कसून तपासणी सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (कर्जत विभाग) विवेकानंद वाखारे आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

या पथकात पोलीस नाईक गोकुळ इंगावले, पोलीस नाईक संग्राम जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राऊत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे, पोलीस कॉन्स्टेबल रवि जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमीला उबाळे यांचा समावेश होता. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button