भुसावळमध्ये रेल्वे तिकीट दलाली प्रकरण उघड ; एकाला अटक

भुसावळमध्ये रेल्वे तिकीट दलाली प्रकरण उघड ; एकाला अटक
भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वे तिकीट दलाली प्रकरणात भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई करत एकाला रंगेहात अटक केली. मोहम्मद युसुफ मोहम्मद इल्यास खाटीक (रा. हबीब मंजिल, मिल्लत नगर, पप्पू किराणा दुकानाजवळ, भुसावळ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
२० मे रोजी ही कारवाई भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली. स्थानक निरीक्षक पी. आर. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदामा यादव, प्रधान आरक्षक नीलेश अढ़वाल व आरक्षक विलाश बोरोले गस्तीवर असताना मोहम्मद युसुफ हा संशयास्पद हालचाली करताना रेल्वे आरक्षण करताना दिसून आला. त्यास तत्काळ ताब्यात घेण्यात आले.
झालेल्या चौकशीत त्याच्याकडे २१ मेच्या १२७१५ सचखंड एक्सप्रेसचे भुसावळ ते नवी दिल्ली दरम्यानचे आरक्षित तिकीट सापडले. संबंधित प्रवाशाकडून तिकीटाच्या मूळ रकमेव्यतिरिक्त दोनशे रुपये दलाली स्वरूपात घेतल्याचे त्याने कबूल केले.
या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाकडून पुढील तपास सुरू आहे. रेल्वे तिकीट दलालांविरोधात रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.