
मुक्ताईनगरातील खड्डेमय रस्ता: प्रशासनाला आणखी किती बळी हवे?
स्थानिक नागरिक संतप्त, बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष
मुक्ताईनगर, सुभाष धाडे
मुक्ताईनगर तालुक्यातील मलकापूर-बुर्हाणपूर प्रमुख राजमार्गावर पुरनाड फाटा ते दुई, सुकळी, डोलारखेडा फाटा या भागात मोठमोठे खड्डे पडून रस्ता धोकादायक बनला आहे. पावसाळ्यापासून या रस्त्याची डागडुजी न झाल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा
या मार्गावरून नेहमी अवजड वाहतूक होत असते, परिणामी रस्ता अक्षरशः चाळणी झाला आहे. विशेषतः राशा बरड येथील चढावर मोठे खड्डे असल्याने अवजड वाहने वारंवार बंद पडतात. अशा वेळी ही वाहने मागे घसरून मागच्या वाहनांना चिरडण्याचा धोका निर्माण होतो.
खड्डे वाढत चालले तरी प्रशासन मात्र मुग गिळून बसल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
अर्धवट डागडुजीमुळे समस्या कायम
काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. अनेक खड्डे तसेच राहिले आणि जे बुजवले गेले, तेही काही दिवसांत उखडले. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शेतकरी व प्रवाशांचे हाल
हा मार्ग परिसरातील शेतकऱ्यांसाठी केळी वाहतुकीसाठी तसेच तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी एकमेव पर्याय आहे. त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था असूनही नागरिकांना हा मार्ग वापरण्याशिवाय गत्यंतर नाही.
वाहनचालकांना खड्डे चुकवत गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून, असंख्य गंभीर आणि किरकोळ अपघात घडले आहेत.
लोकप्रतिनिधींनी त्वरित हस्तक्षेप करावा
“सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. या रस्त्याची योग्य प्रकारे डागडुजी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालावे आणि संबंधित विभागावर दबाव टाकावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.