Crime

ब्रेकिंग : भाजप आमदाराच्या लेटरहेडचा गैरवापर : जळगावातील भाजपचा माजी पदाधिकारी गोत्यात!

३.६० कोटींच्या निधीत अपहार करण्याचा प्रयत्न, आ.प्रसाद लाड यांनी सायन पोलिसात दिली तक्रार

महा पोलीस न्यूज । दि.२९ जुलै २०२५ । भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या लेटरहेड आणि सहीचा गैरवापर करत बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अमित सोळुंके हा पूर्वी भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) चा महाराष्ट्र प्रदेश सचिव होता, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपने मात्र अमित सोळुंकेला गेल्या वर्षीच पदावरून हटवले असल्याचे स्पष्ट केले आहे.

म.टा.ने दिलेल्या वृत्तानुसार, अमित सोळुंकेवर रत्नागिरीमध्ये रस्ते कंत्राट मिळवण्यासाठी बनावट लेटरहेड वापरल्याचा आरोप आहे. न्यायालयाने सोळुंकेला अंतरिम जामीन मंजूर केला असून, तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?
२ जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या लेटरहेडचा गैरवापर करून बीड जिल्ह्यासाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी वळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. प्रसाद लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून २०२५ रोजी त्यांचा नोडल जिल्हा रत्नागिरीहून मुंबईला बदलला होता. असे असतानाही, त्यांच्या नावाने रत्नागिरी जिल्हा नियोजन कार्यालयामार्फत बीडसाठी निधी वळवण्याबाबत बनावट पत्र पाठवण्यात आले होते.

प्रसाद लाड यांचे सहाय्यक सचिन राणे यांना मुंबईतील जिल्हा नियोजन अधिकारी (DPO) संदीप भाकरे यांनी एका संशयास्पद पत्राबद्दल माहिती दिली. तपासादरम्यान, प्रसाद लाड यांच्या नावाने एका विशिष्ट मोबाईल नंबरवरून तोंडी हमी दिल्याचं उघड झालं. यानंतर लाड यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन कार्यालयाला ते पत्र तात्काळ रद्द करण्यास सांगितले.

सरकारी वकिलांनी सोळुंकेच्या जामीन अर्जाला विरोध करताना सांगितले की, साक्षीदारांच्या जबाबामध्ये अमित सोळुंकेची भूमिका समोर आली आहे. तपासात असेही समोर आले की, प्रशांत लांडे नावाच्या व्यक्तीने हे बनावट पत्र बीड जिल्हा नियोजन कार्यालयात दिले. लांडेंनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ते पत्र निलेश वाघमोडे यांनी दिले होते, तर वाघमोडेंनी ते सचिन बनकर यांच्याकडून मिळाल्याचे सांगितले. बनकर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे लांडे, वाघमोडे आणि बनकर यांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट आहेत.

सायन पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसते की, लांडे, वाघमोडे आणि बनकर यांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की, अमित सोळुंकेनेच कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून कमिशन घेतले असावे. सोळुंकेनेच बनावट कागदपत्रे तयार केली आणि तो स्वतः प्रसाद लाड असल्याचं भासवून डिल करत होता, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले आहे.

सोमवारी, सरकारी वकिलांनी सोळुंकेच्या जामीन अर्जाला विरोध करत, त्यानेच बनकर, वाघमोडे आणि इतरांशी संगनमत करून गुन्हा केल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने सोळुंकेला अंतरिम जामीन देताना, तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने नमूद केले की, सोळुंकेचा कोणताही पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि तो जळगाव जिल्ह्याचा कायमचा रहिवासी आहे. खटल्यादरम्यान त्याची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी काही अटी व शर्ती लागू केल्या जाऊ शकतात.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button