
रावेरमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला; दोन महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
शेतात झोपवलेल्या बाळाला झोळीतून ओढून नेत घेतले चावे
रावेर प्रतिनिधी
रावेर तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शेतात झोळीत झोपलेल्या दोन महिन्याच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिला ओढून नेले आणि जबर चावे घेतल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतमजूर कुटुंबावर कोसळले संकट
चौपाली (ता. झिरण्या, जि. खरगोन) येथील अनिल सालम भिलाला (वय ३१) हे पत्नी आणि मुलांसह गेल्या तीन महिन्यांपासून कुंभारखेडा (ता. रावेर) येथे शेतमजुरीसाठी वास्तव्यास होते.
शुक्रवार, ७ मार्च रोजी सकाळी ७ वाजता अनिल भिलाला आणि त्यांची पत्नी मीना हे इतर मजुरांसोबत शेतात काम करत असताना त्यांनी आपली दोन महिन्यांची मुलगी दिव्या हिला झाडाला झोका बांधून झोपवले.
कुत्र्यांचा अचानक हल्ला
शेतात काम सुरू असताना, चार ते पाच भटके कुत्रे त्या ठिकाणी धावत आले. सुरुवातीला मजुरांना वाटले की ते अन्नाच्या शोधात आहेत, मात्र काही क्षणांतच कुत्र्यांनी झोपलेल्या दिव्या हिला झोळीतून खेचून नेले आणि तिला जोरदार चावे घेतले.
अनिल भिलाला हे कुत्र्यांच्या मागे धावत गेले आणि मोठ्या प्रयत्नानंतर त्यांनी मुलीला सोडवले, पण तत्पूर्वीच ती गंभीर जखमी झाली होती.
वाचवण्यासाठी धडपड, पण बाळाचे प्राण गेले
जखमी दिव्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला.
मात्र, उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिव्या हिला मृत घोषित केले.
कुत्र्यांनी डोक्याला, हाताला, पायाला आणि पोटाला जबरदस्त चावे घेतल्याने ती गंभीर जखमी झाली होती, असे डॉक्टरांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; नागरिकांमध्ये संताप
या घटनेमुळे रावेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापूर्वीही अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची आणि तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.