प्रा. डॉ. सुनील नेवे सेऊल (द. कोरिया) येथे आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेसाठी रवाना

प्रा. डॉ. सुनील नेवे सेऊल (द. कोरिया) येथे आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेसाठी रवाना
दक्षिण आशियातील राजकीय ध्रुवीकरण या विषयावर सादर करणार शोधनिबंध
भालोद (प्रतिनिधी) : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे हे दक्षिण कोरिया येथील सेऊल येथे आयोजित पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेसाठी नुकतेच रवाना झाले आहेत. ही परिषद १२ जुलै ते १६ जुलै २०२५ दरम्यान होत आहे.
या परिषदेमध्ये प्रा. डॉ. नेवे “दक्षिण आशियातील राजकीय ध्रुवीकरण : सध्याच्या परिस्थितीत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे तुलनात्मक विश्लेषण” या विषयावर शोधनिबंध सादर करणार आहेत. यामध्ये त्यांनी या तीनही देशांमधील राजकीय ध्रुवीकरणाचे विविध पैलू, कारणे आणि परिणाम यावर सखोल विश्लेषण केले आहे.
शोधनिबंधात प्रा. नेवे यांनी स्पष्ट केले आहे की, भारतात धार्मिक तणाव, आर्थिक विषमता आणि सामाजिक विभाजन हे ध्रुवीकरणाचे प्रमुख घटक असून, सोशल मीडियावरील चुकीची माहिती यामुळे परिस्थिती अधिक बिघडली आहे. पाकिस्तानमध्ये लष्करी हस्तक्षेप, राजकीय अस्थिरता आणि प्रादेशिक तणाव यामुळे लोकशाही अडथळ्यात आली आहे. तर बांगलादेशमध्ये निवडणूक फसवणूक, हिंसाचार आणि हुकूमशाही प्रवृत्तीमुळे लोकशाही प्रक्रिया थांबली आहे.
या तिन्ही देशांना भेडसावणाऱ्या ध्रुवीकरणावर मात करण्यासाठी प्रा. नेवे यांनी संवाद वाढवणे, लोकशाही संस्थांना बळकट करणे, सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे, अल्पसंख्यांकांचे अधिकार रक्षण करणे यासारख्या उपायांचा प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी असेही नमूद केले आहे की, भारताने आपल्या लोकशाही व्यवस्थेत धर्मनिरपेक्षतेला महत्त्व देत सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असून, याचे श्रेय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.
प्रा. डॉ. नेवे यांचा शोधनिबंध दिनांक १५ जुलै २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर केला जाणार आहे. या परिषदेमध्ये जगभरातील प्रथितयश राज्यशास्त्र अभ्यासक सहभागी होणार असून, प्रा. नेवे यांच्या अभ्यासपूर्ण सहभागामुळे भालोद महाविद्यालयाचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढलेला आहे.