शिंदी येथे दोघांना धारदार वस्तूने मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

भुसावळ : तालुक्यातील शिंधी गावामध्ये शिवीगाळ करण्याच्या कारणावरून दोन जणांना
धारदार लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिंदी येथील मुक्तार नजीर शहा (वय ३६) हा तरुण १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शिंदी गावातील उस्मानिया चौकात बसलेला होता. या वेळी संशयित आरोपी सादिक इब्राहिम शहा (रा. नंदुरबार) हा दारूच्या नशेत येवून शहा याला शिवीगाळ करायला लागला. त्यावेळी मुक्तार शहा याने शिवीगाळ करू नको, असे सांगितले. त्याचा राग आल्याने सादिक इब्राहिम शहा, इसराईल दगडू शहा, दगडू हुसेन अली शहा आणि हारून शहा हुसेनअली शहा (सर्व रा. सिंधी, ता. भुसावळ) या चार जणांनी मुक्तार शहा आणि त्याचा नातेवाईक हसनशहा बुडन शहा या दोघांना लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केले.
मुक्तार नजीर शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.कॉ. सुभान तडवी करत आहेत.