रावेर मतदार संघात बंडाळी, राष्ट्रवादीच्या २२० पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे राजीनामे

महा पोलीस न्यूज । वसीम खान । रावेर लोकसभा मतदार संघात भाजपमध्ये राजीनामा सत्र झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटात राजीनामा सत्र सुरू झाले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शब्द दिला होता. मतदार संघात कामाला लागण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. यानंतर मात्र अचानक आयात उमेदवार श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. रावेर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले असून राजीनामा सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसात २२० पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.
शुक्रवारी संतोष चौधरींच्या तब्बल २२० कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सादर केले आहेत. भुसावळ शहरात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर, युवराज पाटील, माजी गटनेता उल्हास पगारे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
रावेर लोकसभा मतदार संघातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव आदी भागातील
प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी गटनेता उल्हास पगारे, युवराज पाटील आदींसह २२० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षातील निष्ठावान जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील आणि माजी आ.संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता आयात उमेदवार श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने राजीनामा देत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पक्षातर्फे अचानक उमेदवार बदल केल्यामुळे माजी आमदार संतोष चौधरी हे दि.१५ रोजी संपूर्ण मतदार संघातील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत, या बैठकीत सर्व कार्यकत्यांसोबत चर्चा करुन लोकसभा निवडणुकीबाबत पुढील भूमिका ठरविणार असल्याची माहिती आहे.
पक्षात काय सुरू आहे?, तेच कळत नाही : दुर्गेश ठाकूर
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र, त्यांचा पक्षाने राजीनामा घेतला नाही. तर दुसरीकडे निष्ठावंत असलेल्या माजी आमदार चौधरींना उमेदवारी दिली नाही. पक्षातही नसलेल्यांना प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिली. यामुळे पक्षात नेमके काय सुरु आहे? हेच कळत नाही, असेही यावेळी शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर यांनी सांगितले.