देवेंद्र फडणवीस घेणार आज मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई ( वृत्तसंस्था ) :- भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमतानं फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. आता गुरुवारी (5 डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शपथविधी कार्यक्रम भव्य करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे
मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही पाठिंबा दिला आहे. दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमात सर्वात प्रथम फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलंय.
गुरुवारी संध्याकाळी (5 डिसेंबर 2024) रोजी साडेपाच वाजता शपथविधी कार्यक्रम सुरु होईल.
यांची राहिल उपस्थिती
या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, शिवराज सिंह चव्हाण, नितीन गडकरी यांच्यासह नऊ ते दहा केंद्रीय मंत्री शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित असतील. त्याचबरोबर भाजपा आणि एनडीए चे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील शपथविधीला येणार आहेत.
सर्वधर्मीय साधूसंत देखील शपथविधी कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पाच ते दहा हजार ‘लाडक्या बहिणी’ येतील, त्यांची वेगळी बसण्याची सोय केली आहे. तसेच महायुतीचे हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहतील.