रेल्वे प्रवाशांचे हरवलेले दागिने, लॅपटॉप व रोख रक्कम आरपीएफकडून परत

रेल्वे प्रवाशांचे हरवलेले दागिने, लॅपटॉप व रोख रक्कम आरपीएफकडून परत
भुसावळ (प्रतिनिधी) –रेल्वे प्रवासादरम्यान हरवलेली बॅग, त्यामधील सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि रोख रक्कम असे सुमारे ७० हजारांहून अधिक किमतीचे सामान भुसावळ रेल्वे स्थानकावरील रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) दक्षतेमुळे संबंधित प्रवाशांना परत करण्यात आले. ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत आरपीएफच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
२१ मे रोजी भुसावळ आरपीएफ ठाण्याला ‘रेल मदत’ पोर्टलवरून एक बॅग हरवल्याची माहिती मिळाली. ही बॅग भाविका राहुल दामगोडे (वय ३५, रा. नवापाडा, शेलवली मनोर रोड, ठाणे) या महिला प्रवाशाची होती. त्या झेलम एक्स्प्रेस (गाडी क्र. ११०७७) मधून प्रवास करत असताना पुणे स्थानकावर उतरताना बॅग जनरल डब्यात विसरून गेल्या होत्या.
गाडी भुसावळ स्थानकात येताच आरपीएफचे संतोष खेडेकर व अवधेश कुमार यांनी संबंधित डब्यात तपासणी केली असता बॅग मिळून आली. तत्काळ व्हिडिओ कॉलद्वारे महिलेची ओळख पटवून बॅग सुरक्षित ठेवण्यात आली. अखेर ३१ मे रोजी सहायक निरीक्षक ओ.पी. मीना यांच्या उपस्थितीत बॅग महिलेच्या ताब्यात देण्यात आली.
लॅपटॉप आणि ट्रॉली बॅगही परत
दुसऱ्या घटनेत ट्रेन क्रमांक १३२०२ पटना जनता एक्स्प्रेसच्या ई/३ डब्यात एका प्रवाशाची अॅस्सू कंपनीचा लॅपटॉप व आकाशी निळ्या रंगाची ट्रॉली बॅग मागे राहिली होती. माहिती मिळताच भुसावळ स्टेशनवरील आरपीएफ कर्मचारी के. एस. वसावे व नरेंद्र गौतम यांनी वेळेवर डब्यात जाऊन बेवारस बॅग शोधून काढली आणि ती संबंधित प्रवाशाच्या ताब्यात दिली.
आरपीएफच्या तत्परतेमुळे प्रवाशांमध्ये समाधान
हरवलेली महत्त्वाची सामान सुरळीतपणे मिळाल्यामुळे संबंधित प्रवाशांनी आरपीएफच्या कार्यशैलीचे कौतुक केले. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या हरवलेल्या वस्तू मिळवून देण्यात आरपीएफ महत्त्वाची भूमिका बजावत असून ‘ऑपरेशन अमानत’ उपक्रमातून नागरिकांना दिलासा मिळत आहे.