जळगाव कृउबा समितीच्या सभापतीपदी सुनील महाजन ठरले ‘लकी’! ; ‘लकी टेलर’ पुन्हा ‘अनलकी’ !

जळगाव कृउबा समितीच्या सभापतीपदी सुनील महाजन ठरले ‘लकी’! ; ‘लकी टेलर’ पुन्हा ‘अनलकी’ !
सभापतीपदासाठी विशेष सभेत १५-२ अशा मतांनी महाजन यांचा दणदणीत विजय
जळगाव प्रतिनिधी : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ऐनवेळी रिंगणात उतरलेले लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांना केवळ दोन मते मिळाली, तर सुनील महाजन यांनी १५ मतांसह सभापतीपदावर शिक्कामोर्तब केले. या निकालाने पुन्हा एकदा ‘लकी टेलर’ हे ‘अनलकी’ ठरल्याची चर्चा बाजार समितीच्या वर्तुळात रंगली आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यंतरी अविश्वास प्रस्तावाचे नाट्य चांगलेच रंगले होते. माजी सभापती शामकांत सोनवणे यांच्या विरोधात १८ पैकी १४ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला सामोरे जाण्यापूर्वीच सोनवणे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी आज, २९ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.
सभापतीपदासाठी सुनील महाजन, मनोज दयाराम चौधरी आणि लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) यांनी अर्ज दाखल केले होते. उपसभापतीपदासाठी गोकुळ चव्हाण यांचा एकमेव अर्ज होता. सभापतीपदाच्या निवडणुकीत मनोज चौधरी यांनी ऐनवेळी आपला अर्ज मागे घेतल्याने सुनील महाजन आणि लक्ष्मण पाटील यांच्यात थेट लढत झाली. मतदान प्रक्रिया हात उंचावून घेण्यात आली. यात सुनील महाजन यांना १५ मते मिळाली, तर लक्ष्मण पाटील यांना केवळ २ मते मिळाली. उपसभापतीपदासाठी गोकुळ चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.
निवड जाहीर होताच सुनील महाजन आणि गोकुळ चव्हाण यांच्या समर्थकांनी बाजार समिती परिसरात जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. सुनील महाजन यांच्या विजयाने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर लक्ष्मण पाटील यांना पुन्हा सभापतीपदाने हुलकावणी दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात या निवडणुकीच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सुनील महाजन यांनी १५-२ अशा दणदणीत मतांनी विजय मिळवला, तर लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांना पराभवाचा सामना करावा लागला. अविश्वास प्रस्तावानंतर रिक्त झालेल्या या पदावरील निवडणुकीने बाजार समितीच्या राजकारणाला नवीन वळण दिले आहे.






