पोलिसांची पक्की टिप, सिनेस्टाईल दोघांना पकडले अन् मिळाले ५ गावठी कट्टे, काडतूस, धारदार कोयता
महा पोलीस न्यूज । २९ जुलै २०२४ । चोपडा तालुका पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीचा अंदाज घेत गावाच्या सीमेवर नाकाबंदी केली. सापळा रचून दुचाकीवर आलेल्या दोघांना अडवत पथकाने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. दोघांना पकडताना पोलिसांची झटापट देखील झाली आणि एकाच्या कमरेला हात घालताच दोन फुटाचा चॉपर लागला. मोठ्या शिताफीने पोलिसांनी दोघांना पकडून झाडाझडती घेतली असता ५ गावठी कट्टे आणि १० जिवंत काडतूस मिळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकाला उमर्टी गावाकडुन सत्रासेन लासुरमार्गे दोन इंसम त्यांचे ताब्यातील दुचाकीवर गावठी कट्टे खरेदी करुन घेवुन जात आहे. निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी लागलीच वरिष्ठांना माहीती देवून पोलीस स्टाफ व पंचांसह लासूर गावाबाहेरील रोडने विटभट्टीजवळ नाकाबंदी लावली. पथकाने सत्रासेनकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु असताना दोन ईसम एका निळ्या रंगाची स्पोर्ट बाईकवर येतांना दिसले.
पथकासोबत दोघांची झटापट
दोघांचा अवतार पाहून त्यांना थांबवून त्यांचे नाव गाव विचारता मोटार सायकल चालक याने त्याचे नाव मोहम्मद लतीप शेख सलीम वय-२४ रा.नारेगाव, गल्ली नं ४, माणिक नगर, संभाजी नगर असे सांगीतले व त्याचे पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्याचे नाव इरफान खान अयुब खान वय-२३ रा नारशेन कॉलनी, संभाजी नगर असे सांगीतले. एकाच्या कमरेला हात लावताच पोलिसांना चॉपर असल्याचे जाणवले. पथक त्यांना ताब्यात घेणार तोच त्यांनी झटापट सुरु केली. पथकाने लागलीच दोघांच्या मुसक्या आवळल्या.
५ गावठी कट्टे, काडतूस हस्तगत
पोलिसांनी त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात ५ गावठी कट्टे, १० जिवंत काडतूस आणि कमरेला लावलेला कोयता मिळुन आला. पोलिसांनी त्यासह २ मोबाईल आणि स्पोर्ट्स बाईक क्रमांक एमएच.२०.डीएक्स.९८८२ ताब्यात घेतले आहे. दोघांवर चोपडा ग्रामीण पो.स्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांची गावठी कट्टे संदर्भातील कामगिरी सुरूच आहे. पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी देखील पथकाचे कौतूक केले आहे.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिशकांत पारधी, राहुल रणधीर, रावसाहेब पाटील दिपक शिंदे, अभिषेक सोनवणे, आत्माराम अहिरे यांच्या पथकाने केली आहे.