बाप रे बाप… ‘मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन क्षेत्रात’ दिसला वाघ!
वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघाची छबी कैद; वन्यप्रेमीत समाधान..!

महा पोलीस न्यूज । सुभाष धाडे । जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पट्टेदार वाघासाठी सुप्रसिद्ध असलेल्या वढोदा वनक्षेत्र तथा प्रस्तावित ‘मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन क्षेत्रात’ वनविभागाने पाणवठ्याजवळ लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात एका पट्टेदार वाघाच्या छबी टिपल्या गेल्याने वनविभागासह वन्य प्रेमीमध्ये आनंद्दाचे वातावरण पसरले आहे.
मे हिटमुळे जीवाची लाही-लाही होत असतांना गारवा मिळवण्यासाठी वन्यजीव थंड्या किंवा पाण्याच्या ठिकाणी वावरतांना दिसतात. वनविभागाकडून वन क्षेत्रात एकूण २२ कृत्रिम पाणवठ्यामध्ये टँकरने पाणी भरले जात आहे. १४ हजार ५०० हेक्टरमध्ये विस्तारलेल्या वढोदा वन क्षेत्रात ५ ते ६ वाघ असण्याची शक्यता असून बिबट्यासह इतर वन्यजीव पुरेशा प्रमाणात आहे. खाण्यास पुरेशा प्रमाणात अन्न तसेच भौगोलिक रचना याशिवाय क्षेत्रातील पूर्णा नदीपात्र तसेच क्षेत्रालागत असलेल्या शेती-शिवारातील केळी बागा यामुळे वाघाचा येथे अधिवास कायम आहे.
जिल्ह्याचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पट्टेदार वाघाची छबी वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने वन्यप्रेमीमंध्ये उत्साहाचे वातावरण असून समाधान व्यक्त होत आहे. वन्यजीवविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास वनविभागाला कळवावी व सहकार्य करावे असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे यांनी परिसरातील जनतेला केले आहेत.