
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवन (लेवा भवन) येथे सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे कार्यालय सुरु झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांचे पुत्र ॲड.पियुष पाटील यांनी जळगाव महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
ॲड.पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लेवा भवन ही महानगरपालिकेची मालमत्ता असून ती कराराच्या अटींनुसार संस्थेला वापरासाठी देण्यात आलेली आहे. करारात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, या जागेचा राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा प्रचारासाठी वापर करता येणार नाही. मात्र, याकडे दुर्लक्ष करून सदर ठिकाणी राजकीय कार्यालय सुरु करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, माजी महापौर व शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी या कार्यालयाचे उद्घाटन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असल्याचेही त्यांनी म्हटले असून तसे स्क्रीन शॉट देखील तक्रारीला जोडले आहेत. यामुळे या प्रकरणाने राजकीय रंग घेतला आहे.
ॲड.पाटील यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तात्काळ कारवाई करून हे अनधिकृत कार्यालय बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच मनपाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या तक्रारीनंतर मनपा प्रशासन पुढील कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारनंतर त्या ठिकाणी केवळ कंटनेर कार्यालय पडून होते आणि इतर काहीही कार्यालय फलक नसल्याची चर्चा सुरू होती. सर्व घडामोडीनंतर पियुष पाटील काय पवित्रा घेतात याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.






