बंद रस्त्यावर झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाची धडक, तिघांचा मृत्यू

बंद रस्त्यावर झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाची धडक, तिघांचा मृत्यू
जळगाव प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील जळगाव खुर्द पुलाजवळ मंगळवारी (११ मार्च) सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. रात्री झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेत सिकंदर नाटूसिंग राजपूत, भुपेंद्र मिथीलाल राजपूत आणि योगेश कुमार राजबहाद्दूर (सर्व राहणार उत्तर प्रदेश) या तिघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रस्त्याचे काम सुरू होते. येथे हे तिन्ही मजूर रात्री लोखंडी पट्टीवर झोपलेले असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अंधारामुळे वाहनचालकाला मजूर दिसले नसल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची नोंद घेऊन पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.