लोकसभा निवडणूक निकाल : असे असणार मतमोजणीचे जम्बो नियोजन

महा पोलीस न्यूज | २ जून २०२४ | जळगाव लोकसभा मतदार संघ आणि रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून दि.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दोन्ही मतदार संघातील मतमोजणीला सकाळी ८ वाजेपासून वखार महामंडळाच्या गोदाम येथे सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी जम्बो नियोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, परीरक्षावधीन आयएएस अधिकारी, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, युवराज पाटील आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
उद्या दि.३ जून रोजी मतमोजणीची चाचणी घेण्यात येणार आहे. सकाळी ५ वाजता नियोजन, सकाळी ६.३० पासून उमेदवार आणि प्रतिनिधींना प्रवेश द्यायला सुरुवात, ७ वाजता गेट उघडण्यास सुरुवात केली जाईल. एका प्रवेशद्वाराला ६ कुलूप लावण्यात आले आहे. १२ ऐवजी ३६ सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. ८ वाजता पोस्टल मतदान मोजणी सुरु होईल आणि ८.३० वाजता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
एका गटाची मतमोजणी करणे, यादी दाखविणे आणि प्रक्रिया करायला साधारणपणे २० ते २५ मिनिटे वेळ लागेल. मतमोजणीसाठी निरीक्षक राहुल गुप्ता – जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर विधानसभा मतदार संघ, सीमा कुमार – एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ, पुष्पांजली दास – चोपडा, रावेर, भुसावळ विधानसभा मतदार संघ, महेंद्र पाल – जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे निरीक्षक असणार आहेत.
प्रत्येक टेबलाकरीता पथकात १ मतगणना पर्यवेक्षक, १ मतगणना सहाय्यक, १ सुक्ष्म निरीक्षक व १ शिपाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघाकरीता तीन राखीव पथके सुध्दा ठेवण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे टपाली मतपत्रिका व ETPB मतगणनाकरीता स्वतंत्र टेबल नेमण्यात आलेले आहेत. शेवटी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील५ व्हीव्हीपॅट मशिनची तपासणी करून पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यास रात्री ८ वाजणार असून त्यापूर्वीच चित्र स्पष्ट होणार आहे.
मतमोजणी ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यात २ अपर पोलीस अधीक्षक, २ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक, २२ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, ४०० पोलीस कर्मचारी, ३ आरसीपी प्लॅटून, २ एसआरपी प्लॅटून, २ सीआरपीएफ तुकड्या तैनात असणार आहे. सर्व घडामोडींवर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी लक्ष ठेवून असणार आहेत.
विजयानंतर २ दिवस कुणालाही विजयी मिरवणूक काढण्यास परवानगी दिली जाणार नसुन त्यानंतर विनंती अर्ज केल्यास त्यावर विचार करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सांगितले. तसेच मतमोजणी काळात जिल्हाभर नाकाबंदी करण्यात येणार असून संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.