Crime
अज्ञात वाहनाच्या धडकेत जामनेर तालुक्यातील युवक ठार ; सुप्रीम कॉलनीजवळील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत जामनेर तालुक्यातील युवक ठार ; सुप्रीम कॉलनीजवळील घटना
जळगाव : सुप्रीम कॉलनीजवळील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (२३ सप्टेंबर) सकाळी १०:३० वाजता झालेल्या अपघातात एका १८ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (रा. लोंढरी, ता. जामनेर, ह.मु. वाळूज, छ. संभाजीनगर) असे आहे.
जयपालने नुकतीच बारावी उत्तीर्ण केली होती. पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर पडला असता एका भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी त्याची प्राणज्योत मालवली.
एकुलता एक मुलगा गमावल्याने पाटील कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.






