Crime

रामदेववाडीजवळ भीषण अपघात : एकाच कुटुंबातील चौघे ठार, ग्रामस्थ संतप्त

महा पोलीस न्यूज | ७ मे २०२४ | जळगाव शहराकडे पाचोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाले असून मृतात तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. घटनेनंतर पोलीस पाटील आल्यानंतर वातावरण चिघळल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून रास्तारोको करीत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण वय – २६ या आशासेविका असून रामदेववाडी गावात सेवा बजावतात. मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्या मुलगा सोहम वय – ७, सोहमेश वय – ४ आणि १६ वर्षीय भाचा असे चौघे इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक एमएच.१९.ईई.८९२५ ने शिरसोलीकडे जात होते. रामदेववाडी गावाच्या पुढे घाट मार्गावर जळगावकडून येत असलेल्या कार क्रमांक एमएच.१९.सीव्ही.६७६७ ने त्यांना जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की दुचाकी चक्काचूर झाली असून चारचाकी रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेचा कंपाऊंड तोडून आत शिरली. अपघातात दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती कळताच सरदार चव्हाण आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. एका पोलीस पाटलाने धडक देणाऱ्या तरुणांची बाजू घेतल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले.

संतप्त जमावाने अपघात करणाऱ्या चारचाकीसह तरुणांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या चारचाकी क्रमांक एमएच.१९.सीजे.११७७ ची देखील तोडफोड केली. वातावरण अधिकच चिघळल्याने दगडफेक देखील झाली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह आरसीपी प्लॅटून आणि पोलिसांचा मोठा ताफा पोहचला आहे.

दरम्यान, धडक देणाऱ्या वाहनात गांजाच्या पुड्या आढळून आल्या असून दोन्ही कार एका बड्या व्यक्तीची असल्याचे समजते. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button