निंबाच्या झाडावर कार आदळली; चार जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

यावल | बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील चिंचोली गावाजवळ शनिवारी (२७ एप्रिल) रात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. गुजरातहून भुसावळला लग्नसमारंभासाठी निघालेल्या मंडळींचे हुंडाई चारचाकी वाहन (क्र. GJ-05-JE-8071) चिंचोली-धानोरा मार्गावर अचानक रस्त्यात कोसळलेल्या मोठ्या निंबाच्या झाडावर आदळले.
या अपघातात वाहनातील चार जण जखमी झाले असून, चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीस गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमी हे गुजरात राज्यातील रहिवासी असून त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महामार्गाच्या कडेला असलेल्या मोठ्या, जिवंत झाडाचा अशा प्रकारे अचानक कोसळणे ही बाब संशयास्पद ठरत आहे. या घटनेनंतर परिसरात अवैध लाकूडतोडीचे सत्र सुरु असल्याची शंका वृक्षप्रेमी व स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी अधिकृत चौकशी व्हावी व संबंधित विभागाने महामार्गालगतच्या झाडांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.