नामंजूर नोंदी मंजूर केल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे आदेश

नामंजूर नोंदी मंजूर केल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे आदेश
भुसावळ : तालुक्यातील कुर्हे प्र.न. येथील मंडळ अधिकारी प्रविण लक्ष्मण पाटील यांनी वराडसीम, साकेगाव व गोंभी शिवारातील गटांवरील नामंजूर नोंदी मंजूर करून पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केला आहे. यासंदर्भातील तक्रार अर्ज ९ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी भुसावळचे उपविभागीय अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, मंडळ अधिकारी पाटील यांनी वराडसीम (गट क्र. ३८२) वरील नामंजूर नोंद ९५६२ नंतर मंजूर नोंद ९५६७ केली, साकेगाव (गट क्र. २९८/१/१/ब/२) वरील नोंद ३१३५९ नामंजूर करून त्याच गटातील ३१४९२ नोंद मंजूर केली. तसेच गोंभी (गट क्र. २३) वरील नोंद १३८३ नामंजूर करून १३८५ आणि १४०७ नोंदी मंजूर करण्यात आल्या.
सदर प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.