Social

जळगावात अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या ‘नाट्यपरिषद करंडकाची’ प्राथमिक फेरी २३ ऑगस्टला

जळगाव (प्रतिनिधी) : रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यंदा पुन्हा राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सव म्हणजेच ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आला असून, त्याचे जळगाव येथे शनिवार, दि. २३ ऑगस्ट रोजी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सहकार्याने प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रप्रमुख गीतांजली ठाकरे यांनी दिली.

मागील वर्षी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर यशस्वीरित्या सादर झाला. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा यांचा समावेश होता.यावर्षी पासून दरवर्षी ‘नाट्य परिषद करंडक’ ह्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीने ठरविले आहे.

ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अश्या दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव केंद्रांवर नूतन मराठा महाविद्यालयाच्या नाट्य सभागृहात प्राथमिक फेरी होणार असून, पारितोषिकप्राप्त निवडक एकांकिकेची अंतिम फेरी मुंबई येथे १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा – माहीम, मुंबई येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातून ९ एकांकिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून, दि. २३ ऑगस्टला सकाळी ८ वाजता उद्‌घाटन झाल्यानंतर स्पर्धेत सुरुवात होणार आहे. यात रंगशाळा जळगाव निर्मित सख्खे शेजारी, दीपरंग भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरची मानस, अभिनय नाट्यकला चाळीसगाव यांची ब्रेकअप, नाट्यरंग जळगाव यांची गाईड, नूतन मराठा महाविद्यालय नाट्यशास्त्र व सांस्कृतिक विभाग जळगाव यांची सुबन्या आणि…, समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बुद्रूक, ता.एरंडोल यांची काजव्यांचे स्वप्न, समर्थ कला बहुउद्देशीय संस्था जळगाव यांची सांबरी, आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव यांची दिशा, भाग्यदीप थिएटर्स जळगाव यांची हम तुम या एकांकिका सादर होणार आहेत.

या स्पर्धेला जळगाव जिल्ह्यातील नाट्यरसिकांनी उपस्थिती देवून, स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अ.भा.मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांच्यासह नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख, जळगाव केंद्रप्रमुख गीतांजली ठाकरे, समन्वयक योगेश शुक्ल, सहसमन्वय पवन खंबायत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button