अमळनेरला उद्या शिवसेनेचा ‘निर्धार मेळावा’

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून अमळनेरमध्ये ‘निर्धार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता नाट्यगृह मंदिर, अमळनेर येथे होणार असून या मेळाव्यास राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मेळाव्यात पक्ष संघटन मजबूत करणे, आगामी निवडणूक तयारी, स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवणे आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका कशी घ्यावी यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषत: मेळाव्यात शिवसेनेच्या भूमिकांवर ठाम राहत “जनतेच्या सेवेसाठी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार” या संदेशावर भर दिला जाणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली आहे.
स्थानिक पातळीवर अलीकडच्या काळात विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर नागरिकांनी आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर होणारा हा मेळावा कार्यकर्त्यांसाठी तसेच नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मेळाव्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






