मक्याचा पिकात ’नशा’: अमळनेर तालुक्यात गांजाची शेती उघड, पोलिसांचा थरारक छापा!*

अमळनेर (पंकज शेटे) :अमळनेर तालुक्यात गांजाची अवैध शेती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमळनेर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गडखांब ते दहिवद रस्त्यादरम्यान गडखांब शिवारातील गट क्रमांक 2324 मध्ये सुमारे १ ते सव्वा बिघा क्षेत्रावर गांजाची शेती केल्याचे उघड झाले आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना पंचनाम्यासाठी घटनास्थळी बोलावले. त्यानंतर ७ तारखेला सकाळी ६ वाजता पोलिस पथकाने छापा टाकला.
छाप्यात गडखांब येथील शेतकरी सुरेश लोटन पाटील याने मका पिकासोबत गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. शेतात सुमारे सहा फूट उंचीची गांजाची झाडे उगवलेली होती. तसेच पाच ते सात गोण्या ओला गांजा बांधून ठेवलेला दिसून आला, तर एका ठिकाणी गांजा वाळवण्यासाठी ठेवण्यात आला होता.
तपासादरम्यान संबंधित शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी गांजा विकल्याची कबुली दिल्याचे समजते. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने देखील पंचनामा सुरू केला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व गांजाची झाडे उपटून मुद्देमाल जप्त करण्यात येणार आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, शरद काकळीज, नामदेव बोरकर यांच्यासह हेडकॉन्स्टेबल व इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पुढील तपास अमळनेर पोलीस करत आहेत.





