Social

अमळगावात 2013 ची पुनरावृत्ती – गाव जलमय, संपर्क तुटला

अमळनेर (पंकज शेटे) – १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अमळगाव व परिसरात २०१३ च्या पूरस्थितीची पुनरावृत्ती झाली. गावातील मरीआई मंदिर परिसरासह अनेक वाड्या-वस्त्या पाण्याच्या वेढ्यात आल्या असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

गावातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले, तर बाजारपेठेतील शॉपिंग कॉम्प्लेक्स जलमय झाले. मुख्य रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे दळणवळण ठप्प झाले होते. वीजपुरवठा व मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळे निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले.

परिसरातील निंभोरा, दोधवद, कलाली या गावांचा संपर्क तुटला. तर गांधली व खेडी येथील पुलांवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली. त्यामुळे गावाबाहेर जाणे व आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणे अवघड झाले.

दरम्यान, चिखली नदीवरील पुलालाही पाण्याचा वेढा होण्यासाठी फारसे अंतर शिल्लक नव्हते, त्यामुळे पुढील काही तासांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

याशिवाय, खवशी येथील क्षेत्र महादेव मंदिर परिसरही पाण्याच्या विळख्यात अडकला. जवळील नदीला अचानक पाणी वाढल्याने आजूबाजूचा परिसर जलमय झाला व तिकडील संपर्क मार्ग खंडित झाला.

दरम्यान, या पूरस्थितीतही मरीआई यात्रा उत्सव मात्र पार पडला. मंदिराजवळील बसस्थानक परिसरात यात्रा भरली गेली. शनिमंदिराजवळील भाग पाण्याखाली असतानाही आदिवासी वस्त्यांमधून नागरिकांनी पाण्यातून वाट काढत यात्रेसाठी हजेरी लावली. लोकनाट्य, तमाशा, पाळणे व दुकानदार यामुळे यात्रेला रंगत आली, मात्र पूरपरिस्थितीमुळे संपूर्ण गावात विरोधाभासी चित्र दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button