मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपक्रमांमुळे मतदानाची वाढली टक्केवारी
अमळनेर : मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासनस्तरावरुन झालेले प्रयत्न तसेच मंगळग्रह सेवा संस्थेने आणि व्हॉईस आॅफ मीडिया या पत्रकार संघटनेने राबविलेले नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे मतदारांना प्रेरणा मिळाल्याने गेल्या चार पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीच्या तुलनेने यंदा मतदानाची टक्केवारी वाढल्याचे चित्र दिसून आले.
अमळनेर विधानसभा मतदार संघात २००९ मध्ये ५८.५१ टक्के, २०१४ मध्ये ६४.९७ टक्के, २०१९ मध्ये ६२.९७ टक्के तर नुकत्याच झालेल्या २०२४ निवडणुकीत तब्बल ६५.६१ टक्के मतदान झाले आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासनस्तरावर ‘स्वीप’ योजनेंतर्गत मतदार जागरुकता अभियान राबविण्यात आले. त्यातच मंगळग्रह सेवा संस्था आणि व्हॉईस आॅफ मीडिया या देशातील क्र. १ च्या पत्रकार संघटनेने मतदान टक्केवारी वाढीस मदत व्हावी म्हणून मतदार जगजागृती रथाची निर्मिती केली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्याहस्ते उद्घाटन करुन सदर रथ संपूर्ण अमळनेर मतदारसंघात फिरविण्यात आला. या रथाद्वारे लाऊड स्पीकरच्या साह्याने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत मतदानाचे महत्त्व पटवून मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. याशिवाय व्हॉईस आॅफ मीडियाच्या राष्टÑीय सचिव दिव्या भोसले आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि व्हॉईस आॅफ मीडियाचे राज्य सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांनी नाट्यगृहात आयोजित मंगलसूर या फिमेल आॅर्केस्ट्रॉसाठी उपस्थित हजारो प्रेक्षकांना मतदान करण्याची सामुहिक शपथ दिली. तसेच मंगळग्रह मंदिरात त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त आयोजित श्री तुलसी विवाह आणि हळद व मेंदी कार्यक्रमानिमित्त उपस्थित हजारो भाविकांनाही मतदान करण्याची सामुहिक शपथ दिली.
याचेच फलित म्हणून एरवी मतदानासाठी बाहेर न पडणारे मतदार बाहेर पडले आणि गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेने यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली.
मंगळग्रह सेवा संस्था आणि व्हॉईस आॅफ मीडियाच्या उपक्रमांमुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, निवडणुक निर्णय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी उपक्रमांचे कौतुक केले आहे.