आंबे-बाम्हणे गावात हातभट्टीवर पोलिसांची धाड; पाच आरोपींना अटक

जळगाव: कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबे-बाम्हणे गावाजवळ अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, दारू तयार करण्याचे साहित्य आणि रसायनांसह ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना गावाच्या शिवारात अवैध हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ग्रेड पो.उ.नि. रामकृष्ण पाटील, पोलीस हवालदार लहू हटकर, श्रीकांत ब्राह्मणे आणि सोनू पाचंदे यांच्या पथकाने २१ ऑगस्ट रोजी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे २,२०० लिटर कच्चे रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी सुकलाल शालिक भिल (३८), दीपक दशरथ भिल (४३), धनराज अर्जुन भिल (५९), नगराज तुकाराम भिल (४३) आणि वाल्मिक भिमा भिल (३९) या पाच जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी आंबे, ता. एरंडोल येथील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.






