दुर्दैवी : अमेरिका ग्लेशियर नॅशनल पार्क : जळगावचा अभियंता तरुण नदीत बेपत्ता, शोध सुरु
महा पोलीस न्यूज । १३ जुलै २०२४ । मूळ जळगाव येथील रहिवासी असलेल्या पाटील कुटुंबातील सिद्धांत पाटील हा तरुण अभियंता अमेरिकेतील ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे. दि.६ जुलै रोजी मित्रांसोबत गेलेला असताना हा अपघात घडला असून अद्याप त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, घटनेच्या काही तास आधी त्याने पार्कमधून त्याच्या आईला मेसेज पाठवला असल्याची माहिती आहे.
विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार, मूळ जळगावकर असलेले पाटील कुटुंबीय पुण्यातील पिंपळे निलख येथे राहायला होते. सिद्धांत कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस (UCLA) मधून एमएस करण्यासाठी २०२० मध्ये यूएसला गेला. तो २०२३ मध्ये कॅडन्समध्ये रुजू झाला. गेल्या शुक्रवारी दि.६ जुलै रोजी तो काही मित्रांसह फिरण्यासाठी अमेरिकेतील ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये गेला होता. सिद्धांतचे वडील विठ्ठल हे मे महिन्यातच महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाले होते.
सिद्धांतने त्याची आई प्रितीला पार्कमधून फोन केला आणि तिला सांगितले की तो इतर सहा भारतीय मित्रांसह तीन दिवस तेथे आलेला असून सहलीचा आनंद घेत आहे. तसेच सिद्धांतने घटनेच्या दोन तास आधी त्याच्या आईला मेसेज पाठवून तो सॅन जोस येथे कॅडेन्स डिझाइन सिस्टम्समध्ये कामासाठी परतणार असल्याचे त्याने त्याच्या आईला सांगितले होते, अशी माहिती त्याचे मामा प्रितेश चौधरी यांनी दिली आहे.
सिद्धांतच्या मित्रांनी त्याच्या आयफोनचे आयएमईआय नंबर पार्क रेंजर्स आणि इतर अधिकाऱ्यांना शोधात मदत करण्यासाठी दिले आहेत. मात्र, याचा अद्यापर्यंत त्याचा कोणताही शोध लागलेला नाही. माजी मंत्री शरद पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील नेत्यांनी सरकारकडे मदतीची विनंती केली आहे. पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखिल शोध मोहिमेच्या अपडेटसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या संपर्कात आहेत.