मराठा आरक्षणाच्या यशामुळे अमळनेर शहरात जल्लोष

मराठा आरक्षणाच्या यशामुळे अमळनेर शहरात जल्लोष
अमळनेर: मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याने अमळनेर शहरात मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि मराठा-कुणबी समाज बांधवांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अभूतपूर्व व शिस्तबद्ध आंदोलनाचे यश
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अभूतपूर्व असा लढा दिला. लाखोच्या संख्येने मराठा समाज या आंदोलनात सहभागी झाला. विशेष म्हणजे, हे आंदोलन पूर्णपणे शिस्तबद्ध, सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने झाले, ज्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
सरकारने लवकरच ‘मराठा आणि कुणबी एकच आहेत’ असा जीआर (शासकीय निर्णय) काढण्याची घोषणा केल्यामुळे मराठा समाज ओबीसी संवर्गात गणला जाणार आहे. यामुळे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि इतर सर्व प्रकारचे फायदे मिळण्यास मदत होणार आहे.
अमळनेरमध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त
आरक्षणाची घोषणा होताच अमळनेर शहरात मराठा आंदोलक प्रवीण देशमुख, जयवंत पाटील, सचिन वाघ, हर्षल जाधव, नगरसेवक शाम पाटील, अक्षय चव्हाण, शुभम, अनिरुद्ध, जयवंतराव पाटील, जयेश पाटील आणि प्रशांत निकम यांनी महाराणा प्रताप चौकात एकत्र येऊन फटाके फोडले. यावेळी “एक मराठा, लाख मराठा” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
हे यश मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्व आणि मराठा समाजाच्या एकजुटीचे प्रतीक आहे.






