अमोल मिटकरी बदनामी प्रकरणी ‘यूट्यूब’ पत्रकारांना कारावासाची शिफारस

अमोल मिटकरी बदनामी प्रकरणी ‘यूट्यूब’ पत्रकारांना कारावासाची शिफारस
चार जणांना पाच दिवसांची शिक्षा ; विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
नागपूर प्रतिनिधी विधान परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते अमोल मिटकरी यांची बदनामी केल्याच्या प्रकरणात ‘यूट्यूब’ माध्यमांवर कार्यरत असलेल्या पत्रकारांना मोठा धक्का बसला असून, विधानमंडळाच्या विशेषाधिकार समितीने चार पत्रकारांना पाच दिवसांच्या कारावासाची शिफारस केली आहे. ‘सत्यलढा’ या यूट्यूब चॅनलवरून अमोल मिटकरी यांच्याविषयी तथ्यहीन व दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित करण्यात आल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.
या प्रकरणी ‘सत्यलढा’ यूट्यूब चॅनलशी संबंधित पत्रकार गणेश सोनावणे, हर्षदा सोनावणे, अमोल नांदुरकर, अंकुश गावडे तसेच संपादक सतीश देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावावर विशेषाधिकार समितीमार्फत सविस्तर चौकशी करण्यात आली. समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सादर केलेल्या अहवालात संबंधित यूट्यूब चॅनलवरून अमोल मिटकरी यांच्यावर खोटे, आधारहीन व दिशाभूल करणारे आरोप करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एका लोकप्रतिनिधीची राजकीय प्रतिमा मलिन झाली असून, हा प्रकार विधानमंडळाच्या विशेषाधिकारांचा भंग करणारा ठरतो, असा ठपका समितीने ठेवला आहे.
दरम्यान, या प्रकरणात संपादक सतीश देशमुख यांनी लेखी माफी मागितल्याने त्यांच्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र उर्वरित चार पत्रकारांना पाच दिवसांच्या कारावासाची शिक्षा देण्यात यावी, असे समितीने स्पष्ट केले आहे. विधिमंडळाचे सत्र सुरू असताना संबंधितांना कारावासात पाठवावे, तसेच सद्य सत्रात ही शिक्षा अंमलात न आल्यास पुढील विधिमंडळ सत्रात तिची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.






