उसनवारीचे पैसे मागितल्याने वृद्धाचा खून, एलसीबीने ५ तासात पकडला आरोपी
महा पोलीस न्यूज | ८ मे २०२४ | भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावाचे मधुल दगडाचे खदानीत साधारण ६० ते ६५ वयोगटातील इसमास काहीतरी घातक शस्त्राने मारहाण करून जिवेठार मारल्याची घटना दि.८ रोजी उघडकीस आली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ५ तासात संशयिताला अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. उसनवारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने खून करण्यात आल्याची माहिती आहे.
भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावाचे मधील दगडाचे खदानीत साधारण ६० ते ६५ वयोगटातील इसमास काहीतरी घातक शस्त्राने मारहाण करून जिवेठार मारल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली होती. त्यावरुन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी जावून खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना आदेश दिले होते.
निरीक्षक किसन नजनपाटील, वरिष्ठ हे स्वतः व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव अश्यांना घेवून घटनास्थळी वरखेड ता.भडगाव जवळील खदान येथे जावून मयताची ओळख पटविली. मयत सुपडु नाना वेलसे, वय ६५, रा. पेठ भाग भडगाव असे मयताचे नाव समजल्याने पथकाने मयताची भडगाव शहरात माहिती घेता गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मयत सुपडु वेलसे हा कुणाल मराठे याचे सोबत होता असे कळले.
पथकाने लागलीच कुणाल मराठे याचा पेठ भागात भडगाव येथे शोध घेवून त्यास ताब्यात त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कुणाल उर्फ हितेश चुडामण मराठे, वय २१, रा.पेठ भाग ता.भडगाव जि.जळगाव असे सांगीतले. पथकाने त्याला विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, मी सुपडु वेलसे याचेकडून उसनवारीवर पैसे घेतले होते. काही पैसे मी सुपडे वेलसे याला परत केले परंतु तो वांरवार माझ्याकडून पैसे मागुन सारखा तगादा लावीत होता. तसेच तो वारंवार माझे घरी येवून मला व माझ्या घरचे लोकांना गल्लीत मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करीत होता. त्यामुळे माझ्या घरची मंडळी माझे आई व वडील हे घर सोडुन निघुन गेले होते.
सततच्या त्रासाला कंटाळून माझी जिवावर आल्याने मी सुपडु वेलसे यास काल दिनांक ७ रोजी तुझे उधारीचे पैसे दयायचे आहे असे सांगुन त्याला एरंडोल रस्त्याला बोलावले. पिंपरखेडला एकजण पैसे देणार आहे त्याचेकडून घेवून तुला देतो असे सांगून सुपडे वेलसे यास माझे मोटार सायकलवर बसवुन त्यास वरखेड गावाचे पुढे पिंपरखेड गावाचे दिशेने घेवून जावून उजव्या बाजुस असलेल्या दगडाच्या खदानीत घेऊन आलो. त्याठिकाणी त्यास मोटारसायकल वरून उतरवुन माझ्याजवळ असलेल्या चॉपरने ठार मारले आहे, अशी कबुली त्याने दिली.
एलसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेवून गुन्ह्याचे पुढील तपासकामी भडगाव पो.स्टे.चे ताब्यात दिले आहे. संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.