भोंदू बाबाविरोधात कठोर कारवाईची मागणी; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन

भोंदू बाबाविरोधात कठोर कारवाईची मागणी; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन
भडगाव (प्रतिनिधी) – नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भडगाव शाखेच्या वतीने कठोर व तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक, भडगाव यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे.
प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अशा प्रकारचे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न ठेवता त्यामागील संपूर्ण यंत्रणा उघड करणे आवश्यक आहे. सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण आणि बुवाबाजी यांचे संगनमत असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
अंधश्रद्धेच्या नावाखाली शोषणाचे गंभीर चित्र
समाजातील भीती, असुरक्षितता आणि वैयक्तिक समस्यांचा गैरफायदा घेत तथाकथित अध्यात्म व ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे आणि सर्वसामान्यांचे शोषण केले जात असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले. अशा बुवाबाजीला सामाजिक मान्यता, आर्थिक स्वार्थ आणि काही प्रमाणात राजकीय व प्रशासकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला.
पीडितांना संरक्षण व कायद्याची कडक अंमलबजावणी गरजेची
या प्रकरणात निष्पक्ष व व्यापक तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पीडित महिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
उपस्थित मान्यवर
यावेळी जिल्हा प्रधान सचिव प्रा. डॉ. दीपक मराठे, शाखाध्यक्ष यूनुस खान, प्रा. डॉ. दिनेश तांदळे, प्रा. डॉ. अतुल देशमुख, प्रा. एल. जी. कांबळे, एस. डी. पाटील, जावेद शेख (पत्रकार), फिरोज मनियार, स्वप्निल सोनार, सुभोध पाटील, गोकुळ चौधरी, नागेश वाघ, डॉ. विकास पाटील, ज्येष्ठ नागरिक अनिल पवार, गुलाबराव जाधव आदी उपस्थित होते.






