CrimeSocial

जळगाव परिमंडलात टीओडी मीटर बसवलेल्या सव्वा लाख ग्राहकांना सवलत

जळगाव परिमंडलात टीओडी मीटर बसवलेल्या सव्वा लाख ग्राहकांना सवलत
दिवसा विजेच्या वापराचा ग्राहकांना फायदा
जळगाव : 1 जुलै 2025 पासून महावितरणच्या टीओडी मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वापरलेल्या विजेवर टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत लागू झाली आहे. टीओडी मीटर बसवलेल्या जळगाव परिमंडळातील 1 लाख 25 हजार 600 घरगुती ग्राहकांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मिळून एकूण 22 लाख 58 हजार रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे.
महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा 1 जुलैपासून सुरु झाला आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.
दरम्यान, नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग होणार असल्याने अचूक बिले मिळतील आणि घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे वीज वापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. तर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. महावितरणकडून सन 2025 ते 2030 या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत मंजूर केली आहे. यात 1 जुलै 2025 ते मार्च 2026 मध्ये 80 पैसे, 2026-27 मध्ये 85 पैसे, 2027-28 व 2028-29 मध्ये 90 पैसे तसेच 2029-30 मध्ये 1 रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.
ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर नवतंत्रज्ञानावर आधारित असून तांत्रिकदृष्ट्या ते अधिक स्मार्ट स्वरूपाचे असले तरी ते प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. प्रगतशील तंत्रज्ञानाचा वापर वीजक्षेत्रात होणे ही काळाची गरज आहे. ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. त्यामुळे वीजबिलाच्या संदर्भाने होणाऱ्या ग्राहक तक्रारीतही कपात होईल.
दरम्यान, टीओडी मीटर असल्याशिवाय घरगुती ग्राहकांना दिवसाच्रूा वीजवापराची सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर आवश्यकच आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याकामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button