आरटीओ कार्यालयात मनमानी कारभार, कमी रकमेत मिळतो फॅन्सी नंबर?
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगांव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेहमीच चर्चेत राहिले आहे. अनेक महिन्यानंतर जळगाव कार्यालयाला अधिकारी लाभले असून त्यांच्या नूतन काळातच त्यांच्याविरुद्ध राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. राजकीय पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारी पत्रामुळे एक फॅन्सी क्रमांक चक्क कमी किमतीत दिला जाणार होता. माध्यम प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दखल घेतल्याने संबंधित वाहन मालकाला तो क्रमांक मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील व्यावसायिक संजय चव्हाण यांनी एमएच.१९.ईएम.०००५ या क्रमांकासाठी नियमानुसार १५ हजार आणि अतिरिक्त बोली लागल्यास ५-५ हजाराचे २ डीडी पाकीटात टाकून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नावे दिले होते. नेमके त्याच क्रमांकासाठी आणखी एका व्यक्तीने बोली लावली आणि त्यांनी १५ हजाराचा डीडी दिला होता. आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याने दोन्ही लिफाफे उघडले असता अधिकची रक्कम असल्याने आणि दुसऱ्या व्यक्तीने एमएच.१९.ईएम.००५५ हा देखील पर्याय दिला असल्याने एमएच.१९.ईएम.०००५ हा क्रमांक संजय चव्हाण यांना देण्याचे निश्चित झाले.
तक्रार अर्जानंतर पावती देण्यास टाळाटाळ
संजय चव्हाण यांना एमएच.१९.ईएम.०००५ हा क्रमांक तर दुसऱ्या व्यक्तीला एमएच.१९.ईएम.००५५ हा क्रमांक देण्यात आला. एकाच क्रमांकासाठी ३ डीडी देणे नियमात नसून संबंधित अधिकारी व वाहन मालक यांचे संगनमत असल्याचा आरोप करणारी तक्रार दुसऱ्या व्यक्तीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे केली. संबंधित व्यक्ती एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने पत्राची दखल घेत एमएच.१९.ईएम.०००५ हा क्रमांक त्यांना देण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने संजय चव्हाण यांना पावती देण्यास टाळाटाळ करण्यात येऊ लागली.
४ दिवसांनी मिळाला न्याय
चार दिवस होऊन देखील संजय चव्हाण यांना पैसे भरून क्रमांक मिळण्याची पावती मिळत नव्हती. चव्हाण यांनी तो क्रमांक सोडून द्यावा यासाठी काही अधिकारी, कर्मचारी त्यांची मनधरणी करत होते. दिवस लांबत असल्याचे लक्षात आल्याने चव्हाण यांनी माध्यम प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते शैलेश सपकाळे यांना सांगितले. सर्व एकाच वेळी आरटीओ कार्यालयात पोहचले आणि त्यांनी याबाबत विचारणा केली. आपले काहीतरी चुकत असल्याचे लक्षात येताच चव्हाण यांना क्रमांक मिळाल्याची पावती देण्यात आली.
पहा संपूर्ण व्हिडिओ :