तापीचे लचके तोडणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करा; अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
अधिकारी व पोलिस यांच्या आशीर्वादाने अवैध वाळू उपसा सुरू; गावकऱ्यांचा आरोप

अमळनेर (पंकज शेटे): अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील तापी नदीपात्रातून अधिकृत ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन करून बेसुमार अवैध वाळू उपसा केला जात आहे. नदीचे ‘लचके तोडणाऱ्या’ या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते परेश रवींद्र उदेवाल यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
नियम धाब्यावर बसवून अवैध उपसा
शासनाकडून तापी नदीपात्रात वाळू उपशासाठी काही ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे. मात्र, हे ठेकेदार शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन करत आहेत. मंजूर मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात वाळू काढली जात असून, विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर करून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न
अवैध उपशामुळे नदीपात्राचे नुकसान होऊन पर्यावरणीय समतोल बिघडत आहे. याचे गंभीर परिणाम खालीलप्रमाणे दिसून येत आहेत:
* शेती व पाणीपातळी: परिसरातील शेती आणि भूगर्भातील पाणीपातळीवर विपरीत परिणाम होत आहे.
* पायाभूत सुविधा: पूल आणि रस्ते धोक्यात आले आहेत.
* अपघाताची भीती: जड वाहने शहरातून भरधाव वेगाने जात असल्याने नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
महसूल बुडवण्याचा प्रताप
वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे कोणतीही अधिकृत पावती नसते किंवा वाहनांचे वजन केले जात नाही. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत असल्याचा आरोपही उदेवाल यांनी केला आहे.
याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करावी आणि संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार अमळनेर यांनाही माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.






