सीबीआयकडून आयुष मणियार यांची ६ तास चौकशी, जाबजबाब नोंदवले
महा पोलीस न्यूज । दि.२३ डिसेंबर २०२४ । चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याची सीबीआयकडून जळगावात चौकशी सुरू आहे. सोमवार दि.२३ रोजी अजिंठा विश्रामगृहात आयुष मणियार यांची देखील चौकशी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बीएचआर प्रकरणात सुनील झंवर यांना जेलमध्ये अडकवून न ठेवण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी अँड.प्रवीण चव्हाण यांच्यासह इतरांवर चाळीसगाव पोलिसात सूरज झंवर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अँड.प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित काही गुन्ह्याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. सीबीआयचे अपर पोलीस अधीक्षक हरजितसिंग सचर हे जळगावात आले असल्याचे समजते.
सीबीआयचे पथक ७ दिवसापासून जळगाव शहरात ठाण मांडून असून अजिंठा विश्रामगृहात एकेकाला जाब जबाब नोंदवण्यासाठी बोलवले जात आहे. अगोदर निलेश भोईटे, सुनील झंवर, सुरज झंवर यांचे जबाब सीबीआयने नोंदवले आहे. चाळीसगाव गुन्ह्यातील साक्षीदार आयुष मणियार आणि विशाल पाटील यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सुमारे ६ तासांपेक्षा अधिक काळ ही चौकशी सुरु असल्याचे समजते.