Other

वाळू माफियांनी पोलिसांनाच धमकावले; महसूल पथकावर दगडफेक, ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाळू माफियांनी पोलिसांनाच धमकावले; महसूल पथकावर दगडफेक, ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

गिरड जवळील गिरणा नदी पात्रातील घटना

भडगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील गिरड जवळील गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान वाळू माफियांनी महसूल आणि पोलीस पथकावर दगडफेक करत हुज्जतबाजी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाचोरा येथील रितेश पाटील उर्फ आबा याच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून जेसीबी, डंपर आणि ट्रॅक्टरसह ३७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, ३० डिसेंबरच्या मध्यरात्री भडगाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रशांत सावकारे, मिलिंद निकम, कर्मचारी रामकृष्ण मनोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर जाधव यांचे पथक गिरणा नदी पात्रात गस्त घालत होते. यावेळी गिरड-मांडकी रस्त्यावर पथकाला एक पिवळ्या रंगाचे जेसीबी, दोन डंपर आणि एक वाळू उपशाची ‘किन्ही’ जोडलेला ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना आढळले. पथकाने वाहने अडवून चौकशी केली असता चालकांनी परवाना नसल्याचे सांगितले आणि अंधाराचा फायदा घेत वाहने सोडून पळ काढला.

महसूल पथक वाहने ताब्यात घेण्याच्या तयारीत असतानाच त्या ठिकाणी २० ते २५ जणांचा जमाव जमा झाला. काही वेळातच काळ्या रंगाच्या स्कार्पिओमधून (क्र. MH 20 DV 5774) रितेश पाटील उर्फ आबा नावाचा इसम तिथे आला. त्याने पथकाशी हुज्जत घालत, “तुम्ही मला ओळखत नाही का, माझी पण काही इज्जत आहे, तुम्ही वाहने कशी नेतात तेच बघतो,” अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यानंतर जमावाने आरडाओरड करत शिवीगाळ आणि दगडफेक सुरू केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भडगाव पोलिसांनी अतिरिक्त कुमक पाठवली, ज्यामध्ये उपनिरीक्षक सुशील सोनवणे व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पोलिसांचा ताफा वाढलेला पाहून सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या धडक कारवाईत प्रशासनाने १५ लाख रुपये किमतीचे जेसीबी, १०-१० लाख रुपयांचे दोन डंपर आणि ट्रॅक्टर असा एकूण ३७ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी प्रशांत सावकारे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात वाळू माफियांना कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button