Other

भडगाव नगरपरिषदेच्या प्रस्तावित कर आकारणीला तीव्र विरोध

भडगाव नगरपरिषदेच्या प्रस्तावित कर आकारणीला तीव्र विरोध

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव नगरपरिषदेने पाठवलेल्या प्रस्तावित एकत्रित मालमत्ता कर आकारणीच्या नोटिसांविरोधात तीव्र हरकत नोंदवत ती त्वरित रद्द करून स्थगित करण्याची मागणी अटल भाजपा कार्यालय आणि मालमत्ताधारकांनी मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सदरची कर आकारणी म.न.पा. अधिनियम १९६५ आणि म.नगरपालिका एकत्रित कर नियम १९६९ यातील विविध तरतुदींचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे करण्यात आली आहे. शिक्षण, अग्निशमन व रोजगार हमी कर लावण्यात आले असले तरी अशी कोणतीही सेवा भडगाव नगरपरिषद पुरवत नाही, हेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

ठरावाची वैधता संशयास्पद
दिनांक १५ मे २०२३ रोजी प्रशासकीय काळात ठराव क्र. ३०१ ने मालमत्ता कर वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. हा ठराव कोणतेही लोकप्रतिनिधी नसताना, एकाच व्यक्तीकडून सुचवून व मंजूर केला गेला असल्याने त्याची वैधता कायदेशीरदृष्ट्या संशयास्पद आहे, असा दावा करण्यात आला आहे.

मूल्यांकन पद्धती अस्पष्ट
नवीन कर दर ठरवताना कोणते क्षेत्रफळ, चटईदर अथवा मूल्यांकन पद्धत वापरली गेली, याची कोणतीही स्पष्ट माहिती नोटिसीत नमूद केलेली नाही. शिवाय अपीलीय समितीच अस्तित्वात नसल्यामुळे नागरिकांच्या हरकती कुणासमोर मांडायच्या, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या संबंधित मंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.
निवेदनावर सचिन चोरडिया, नरेंद्र पाटील, धर्मेंद्र परदेशी, किरण शिंपी, कुणाल पाटील, निखिल कासार, देविदास पाटील, रविंद्र कुंभार, मधुकर महाजन आदींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button