भडगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, ४३ मतदान केंद्र

महा पोलीस न्यूज । विजय माळी । नगरपरिषद निवडणुकांची अधिसूचना जाहीर होताच शहरात निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. यंदा बारा प्रभागांमधून चोवीस नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार असून प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शितल सोलाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील निवडणूक २०१४ साली पार पडली होती. त्यानंतर दीर्घ काळानंतर होणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुकीकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. आचारसंहितेनुसार शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय फलक, झेंडे, प्रचार साहित्य हटविण्यात आले असून कोणताही पक्ष किंवा उमेदवार नियमांचे उल्लंघन करणार नाही यासाठी विशेष पथके नियुक्त केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी आचारसंहिता कक्ष, एकखिडकी सुविधा केंद्र, भरारी पथक, चित्रीकरण यंत्रणा, तसेच आवश्यक स्ट्राँग रूम व मतमोजणी कक्ष यांची पाहणी करण्यात आली आहे. नगरसेवक पदांसाठी नामनिर्देशन स्वीकारण्यासाठी पाच पथके तर नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र पथक अशी एकूण सहा पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
या निवडणुकीत एकूण ३८,३०२ मतदार मतदानासाठी पात्र असून शहरात ४३ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान शांततेत आणि मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी प्रशासनाकडून ‘शंभर टक्के मतदान करा’ असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेस मुख्याधिकारी सवालिहा मालगावे, नायब तहसीलदार अनिल भामरे, नायब तहसीलदार रमेश देवकर उपस्थित होते.






