अज्ञात वाहनाच्या धडकेत मानपूरच्या पोलीस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू; नांदवेल शिवारातील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): रस्त्याने पायी जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील पोलीस पाटील मुकेश आनंदा तायडे (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मुक्ताईनगर-कुऱ्हा काकोडा रस्त्यावरील नांदवेल गावाजवळ गुरुवारी पहाटे उघडकीस आली.
मॉर्निंग वॉक दरम्यान घटना उघड
नांदवेलचे पोलीस पाटील अनिल समाधान वाघ हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. डोलारखेड्याच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर त्यांना रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, ते त्यांचे मित्र आणि मानपूरचे पोलीस पाटील मुकेश तायडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अपघाताचे भीषण स्वरूप
घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे आयशर किंवा मालट्रकच्या बंपरचे तुकडे विखुरलेले आढळले. यावरून रात्रीच्या सुमारास एखाद्या जड वाहनाने तायडे यांना पाठीमागून जोरदार धडक दिली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अनिल वाघ यांनी तातडीने मुक्ताईनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
रुग्णालयात मृत घोषित
घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी असलेल्या तायडे यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
परिसरात हळहळ: ‘गुरांचे डॉक्टर’ म्हणून होती ओळख
मुकेश तायडे हे २०१६ पासून मानपूर येथे पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते. पोलीस पाटील होण्यापूर्वी त्यांनी सुकळी आणि चिंचखेडा परिसरात खासगी पशुवैद्यकीय सेवा दिली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात ते ‘मुकेश डॉक्टर’ या नावाने परिचित होते. त्यांच्या निधनामुळे तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.






