रावेर पोलिसांची मोठी कारवाई : बुलेट राजा चोरटी गँग जाळ्यात, ९ दुचाकी हस्तगत

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । रावेर तालुक्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत रावेर पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली असून तब्बल १३ लाख १० हजार रुपये किमतीच्या ९ महागड्या दुचाकी हस्तगत करत तीन सराईत संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रावेर पोलिस स्टेशन येथे दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा र.नं. ५००/२०२५ भा.न्या.संहिता कलम ३०३ (२) अन्वये रॉयल एनफिल्ड (बुलेट) मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी हे जळगावहून काही कामानिमित्त रावेर येथील चौराहा भागात नातेवाईकांकडे आले होते. त्यांनी आपली नविन पांढऱ्या रंगाची बुलेट घराखाली लावून वर गेले असता काही वेळातच अज्ञात चोरट्यांनी ती मोटारसायकल चोरून नेली होती.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रावेर शहरातील तब्बल ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. मात्र आरोपींनी डोक्यावर टोपी घालून चेहरा झाकल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. तपासात आरोपींची विशिष्ट ‘मोडस ऑपरेन्डी’ उघड झाली. ते दुचाकी लोटत नेत, पुढे जाऊन लॉक तोडून वाहन सुरू करत असत. अशाच पद्धतीचा प्रकार भुसावळ येथे घडल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास अधिक गतिमान करण्यात आला.
दरम्यान चोरीची बुलेट शिरपूर येथे विकली गेल्याची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना मिळताच रावेर गुन्हे शोध पथकाला सखोल तपासाचे निर्देश देण्यात आले. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी चोपडा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचा सुगावा लागताच आरोपींनी पलायनाचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून तपास पथक कोरपावली (ता.यावल) येथे पोहोचले.
तेथे संशयीत आरोपी क्र. गौरव दत्तात्रय तायडे (वय २०), तौसिफ तय्यब कुलकर्णी (वय २०) आणि अब्दुल रहेमान तैय्यब पटेल (वय २०), सर्व रा. कोरपावली ता. यावल जि. जळगाव, यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत आरोपींनी ९ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
महागड्या दुचाकी केल्या हस्तगत
तपासात आरोपींनी केवळ महागड्या आणि नव्याने लाँच झालेल्या दुचाकींचीच चोरी केल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये रॉयल एनफिल्ड (बुलेट), आर-१५, सुझुकी बर्गमन, स्प्लेंडर आदी वाहनांचा समावेश आहे. काही दुचाकी आरोपींच्या घरातून तर काही एकांतस्थळी लपवून ठेवलेल्या अवस्थेत हस्तगत करण्यात आल्या. या कारवाईत पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
केटरिंगच्या कामनिमित्त रेकी, बनावट आर.सी.बुक तयार
आरोपी केटरिंगच्या कामानिमित्त गुजरात राज्यातील वडोदरा व इतर शहरांत जात रेकी करत असत. पसंतीची दुचाकी चोरी करून ती महाराष्ट्रात आणून कोरपावली गावात विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपींकडून एकूण ९ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत १३ लक्ष १० हजार रुपये इतकी आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी साथीदार निष्पन्न होण्याची शक्यता असून, चोरीनंतर बनावट आर.सी. बुक तयार केल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. त्या दिशेने पुढील तपास सुरू आहे.
पथकात यांचा होता समावेश
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक सुनिल मोरे तसेच रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ ईश्वर चव्हाण, पो.ना.कल्पेश आमोदकर, पो.शि.प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, तथागत सपकाळे, रुबाब तडवी, गजानन बोने यांनी आरोपीताचा शोध घेतला असून तपास पो.ना. कल्पेश आमोदकर करीत आहेत.






