Politics

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात ‘इनकमींग’

लक्ष्मण पाटील, डॉ.अस्मिता पाटील यांच्यासह अनेकांचा प्रवेश

महा पोलीस न्यूज | १३ एप्रिल २०२४ | जळगाव जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग सुरूच असून आज ज्येष्ठ नेत्या डॉ.अस्मिता पाटील व बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध पदाधिकार्‍यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे.

जळगाव जिल्हा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात अलीकडच्या काळात अनेक मान्यवर दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच जळगावचे खासदार उन्मेष पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या समर्थकांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. यानंतर लागलीच करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देखील मिळाली होती. यानंतर, लवकरच शिवसेना-उबाठा पक्षात मान्यवरांचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने आज मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

आजच्या सोहळ्यात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील, भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर, जळगावच्या माजी नगरसेविका सरिता नेरकर, वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील नेते मोरसिंग राठोड यांच्यासह इतरांनी पक्षात प्रवेश घेतला.

आजच्या प्रवेश सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात पाचोरा-भडगाव मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी पक्षात दाखल झाले. यात शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या डॉ.अस्मिता पाटील यांच्यासह युवक राष्ट्रवादीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष तथा लासुरे येथील रहिवासी अजय रंगराव देवरे, पंचायत समितीचे माजी सभापती तथा पिंपळगाव हरेश्‍वर येथील रहिवासी देविदास रामदास महाजन; लासुरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कपिल शिवाजी देवरे, लासुरे येथीलच सामाजिक कार्यकर्ते पंकज सुभाष देवरे, पाचोर्‍याचे माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ता शेख रसूल शेख उस्मान; पाचोरा येथील अल्पसंख्यांक कार्यकर्ता फिरोज पिंजारी; भडगाव येथील बशीर करीम शेख; कामरान बशीर शेख; इलियास अब्बास अली; शाहबाज इफ्तीखार सय्यद, अहमद शमीउद्दीन शेख; भडगाव येथील सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक बशीर शेख, भडगाव येथीलच राजू शेख; अभियंता मोहन परदेशी, वकील संघाचे सदस्य मोहसीन शेख; सामाजिक कार्यकर्ता साबीर शेख; शफीक टेलर, उषाताई परदेशी, गायत्रीताई पाटील, शब्बीर खान, शेख इब्राहिम, शेख अख्तर मुल्ला; शेख सलीम, अजमल खान, शेख खालीक; जुवार्डी येथील माजी सरपंच नाना रामदास पाटील, जुवार्डी विकासो चेअरमन प्रकाश रामराव पाटील, शिवाजी लक्ष्मण पाटील, आबा केशव पाटील व संजय शिवराम पाटील या मान्यवरांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे, संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेषद पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ज्येष्ठ नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी उध्दव ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून या नेत्यांच्या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात पक्षाला मोठ्या प्रमाणात बळकटी मिळून लोकसभा निवडणुकीत याचे प्रतिबिंब उमटणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या मनोगतातून पाचोरा-भडगाव मतदारसंघात वैशाली सुर्यवंशी यांच्या प्रयत्नांना डॉ.अस्मिता पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांमुळे मजबुती मिळणार असल्याचे प्रतिपादन केले. तर, वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून विविध मान्यवरांचे पक्षातील आगमन हे स्वागतार्ह असून हा विरोधकांना सुरूंग लागला असून याचे आगामी काळात नक्कीच पडसाद उमटणार असल्याचे प्रतिपादन केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button