मोठी बातमी : ‘नही’च्या प्रकल्प अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त!

महा पोलीस न्यूज । दि.५ मे २०२५ । पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथील शेतकऱ्याची शेतजमीन महामार्गात गेल्यानंतर त्याने वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. २०११ पासून सुरू असलेले प्रकरण २०२२ मध्ये न्यायालयात पोहचले. शेतकऱ्याने दाखल केलेली दरखास्त मंजूर केल्यानंतर देखील नही भरपाई देत नसल्याने अखेर न्यायालयाने जप्तीचे आदेश काढले. सोमवारी नही अधिकाऱ्यांचा खुर्ची आणि लोखंडी रॅक जप्त करण्यात आले.
मोंढाळे ता.पारोळा येथील रहिवासी असलेले शेतकरी नवाब मेहबूब खाटीक यांची शेतजमीन महामार्गात गेली होती. त्यात खाटीक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विरुद्ध केलेल्या दाव्याची २०११ मध्ये अधिसूचना निघाली होती. २०१३ मध्ये त्यात अमळनेर प्रांत अधिकारी कार्यालयात निवडा पार पडला. दर कमी मिळाल्याने नवाब खाटीक यांनी नंतर जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे वाढीव मोबदलासाठी अर्ज केला होता. २०१५ मध्ये जिल्हाधिकारी यांनी त्यास मंजुरी दिली.
न्यायालयाने फेटाळली याचिका
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध २०२२ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडे याचिका दाखल केली होती. २ ऑक्टोबर २०२४ रोजी न्यायालयाने नहीची लवाद याचिका फेटाळली. त्यांनतर शेतकरी नवाब खाटीक यांनी वाढीव मोबदला, वरील व्याज, दिलासा रक्कम वसुलीसाठी अर्ज दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर शरद परदेशी यांच्याकडे दाखल केला होता.
नहीचे साहित्य जप्तीचे आदेश
नवाब खाटीक यांनी १ कोटी ४४ लाख ४४८ रुपये इतकी रक्कम मोबदला म्हणून मागणी केली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मोबदला रक्कम भरण्यासाठी कोणतीही तसदी घेतली नाही. त्यामुळे ३ मे रोजी न्यायालयाने वस्तू जप्तीसाठी आदेश जारी केले. ३ दिवस सुट्टी असल्याने आज नही अधिकाऱ्यांची खुर्ची आणि लोखंडी रॅक जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
यांनी पाहिले कामकाज
शेतकरी नवाब खाटीक यांच्यातर्फे अँड.कुणाल पवार यांनी कामकाज केले. कारवाई प्रसंगी त्यांच्यासोबत अँड.जयप्रभा भोईटे, अँड.ए.के.मोरे, अँड.कल्पेश पाटील, अँड.सुरेश महाजन, अँड.शैलेश ठाकूर, अँड.अश्विनी गिरासे, न्यायालयांचे बेलीफ चंदनकर व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.